जेव्हा बहिणीने राखी बांधल्यावर भावाला हार्ट अटॅक येतो तेव्हा पहा बहिणीसोबत काय घडते..

या कथेचे संपूर्ण श्रेय सिद्धी भुरके यांना जाते…., “चित्रा… अगं चित्रा.. इथले पडदे कुठे गेले? कोणी बदलले? माहितीये ना सुमित्राने भरतकाम केलेले होते ते.. ” सकाळी सकाळीच आज अण्णांचा म्हणजे माधवरावांचा पारा चढला होता. “अहो अण्णा फार जुने दिसत होते ते.. घराच्या कलर स्कीमला मॅच नव्हते होत म्हणून बदलले मी.. “चित्राने म्हणजे अण्णांच्या मोठ्या सुनेने उत्तर दिले. “अगं ती सुमित्राची आठवण होती म्हणून ठेवले होते.. माणसांप्रमाणे आता तुम्हाला त्यांच्या वस्तूची पण अडचण झाली का?”. “अहो अण्णा सासूबाई जाऊन आता 10 वर्ष झालीत.. किती दिवस जपणार त्या जुन्या गोष्टी.. मला उशीर होतोय ऑफिसला.. मी येते..” म्हणून चित्रा तिथून निघून गेली. अण्णांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. दोन मुलं, दोन सुना, मोठा बंगला असं सगळं सुख असताना ते एकटे पडले होते.

ते आपल्या बायकोच्या फोटोसमोर उभे राहिले. “सुमित्रा का गं गेलीस मला लवकर सोडून?, लवकर बोलवून घे मला.. नाही सहन होत आता.. “अण्णांना आज त्यांच्या पत्नीची फार आठवण येत होती. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. बघतात तर ईराचा फोन होता. “हॅलो.. हॅलो अण्णा कुठे आहात ?? मी किती वेळ झालं वाट बघतीये या लवकर कॉफी शॉपला..”, “अग हो हो निघालो.. येतो 10 मिनटात.. “म्हणत अण्णांनी फोन ठेवला आणि ड्राइवर सोबत कॉफी शॉपला निघाले. अण्णा म्हणजे माधव आपटे तसं मोठं प्रस्थ.. गाडीचे पार्टस बनवायच्या दोन मोठ्या कारखान्याचे मालक, काही वर्षांपूर्वीच बायकोचं निधन झालं होतं, आता दोन मुलं, दोन सुना आणि परदेशात शिकत असलेली नातवंड असं त्यांचं कुटुंब. आणि ही ईरा अगदी सात आठ वर्षांची असेल तेव्हा अण्णांच्या शेजारच्या बंगल्यात राहायला आली होती. अण्णा आणि सुमित्रा ताईंची तर फार लाडकी होती. रोज अण्णांच्या घरी खेळायला यायची.

तेव्हापासून तिची आणि अण्णांची चांगली गट्टी जमली होती. एकदा तर शाळेतून फ्रेंड्शिप बँड आणि राखी दोन्ही घेऊन आली.. आणि अण्णांना म्हणाली, “आजपासून तू माझा कृष्ण.. माझा फ्रेंड आणि भाऊ पण..” लालअण्णांना काही समजलं नाही, “अगं फ्रेंड आणि भाऊ.. दोन्ही कसं काय होऊ मी?, आणि कृष्ण काय?”, तेव्हा ती निरागस ईरा म्हणाली, “आज टीचरने कृष्ण आणि पांचालीची स्टोरी सांगितली.. त्यात कृष्ण तिचा फ्रेंड आणि भाऊ पण असतो.. आता तू मम्माच्या मार पासून मला वाचवतोस म्हणून भाऊ आणि माझ्यासोबत खेळतोस म्हणून फ्रेंड पण झालास.. तू कृष्ण झाला ना.

म्हणून राखी आणि बँड पण तुझ्यासाठी अण्णांना लहान ईराच हे उत्तर फार आवडलं आणि तेव्हा पासून ते तिचा भाऊ आणि मित्र दोन्ही होते. बघता बघता ईरा आता मोठी झाली होती, कॉलेजला जात होती पण अण्णांसोबतची मैत्री काही बदलली नव्हती. अण्णा पण उतार वयात एकटे पडल्याने तिच्याशी मनसोक्त बोलत आणि त्यात आज फ्रेंड्शिप डे आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आले असल्याने ईराने अण्णांना कॉफी शॉप मधे सेलेब्रेशनसाठी बोलवलं होत. आण्णा पोहचले तिथे.. ईराने त्यांना बँड आणि राखी बांधली, दोघांनी कॉफी प्यायली आणि गप्पा मारत बसले. मैत्रीला वयाचे बंधन नसते हे त्यांच्याकडे बघून कळायचे.

“अण्णा इतके सॅड का आहात? आज किती स्पेशल दिवस आहे आणि असे उदास नका राहू “इरा बोलली, “काय सांगू तुला.. तू सोडून मला कोणी विचारत पण नाही.. म्हातारपण अजब चेष्टा करतंय माझ्याशी.. मागचे दिवस कसे झपझप निघून गेले कळलंच नाही मला, बघता बघता म्हातारा झालो. आता मात्र सोबतीला, आपली काळजी घेणारं.. अजूनही मी तरुणच आहे असं समजणारं कोणीतरी पाहिजे असतं गं.. सुमित्राची फार आठवण येतीये आज.. आपला आवडता माणूस शेवट पर्यंत आपल्यासोबत राहायला खूप नशीब लागत गं.. पण माझ्या वाट्याला ते नाही.. मुलं आणि सुना काही किंमत देत नाहीत गं बघितलं तर मी उभ्या केलेल्या साम्राज्यावरच जगत आहेत. बर ते जाऊ दे कमीत कमी बाप म्हणून तरी किंमत द्यावी.. “अण्णा एखाद्या लहान मुलासारखे आता रडू लागले..

पण बघता बघता त्यांना घाम फुटला, आणि छातीतून कळा येऊ लागल्या आणि ते कोसळले. ईराने पटकन ऍम्ब्युलन्स बोलवून त्यांना ऍडमिट केलं, त्यांच्या घरी फोन करून सांगितले सुद्धा…. थोड्या वेळाने त्यांची मुलं आणि सुना तेथे आल्या, अण्णांना हार्ट अटॅक आला होता डॉक्टर बोलले, अण्णांवर शस्त्रक्रिया झाली आणि आता काळजीच कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. “अण्णांवर कोणताही मानसिक आघात होणार नाही. तेवढं बघा”.. असं डॉक्टरांनी सांगितलं. पण इथे काहीतरी वेगळंच घडत होतं, अण्णांना दिवसभर भेटायला कोणी येत नव्हत..सगळे कामातून मोकळे झाले कि निवांत रात्री दोन्ही मुलं यायची सुनांनी कधी वेळेत जेवणाचा डबा दिला नाही.

ईरा मात्र दिवसभर तिथेच असायची, त्यांच्याशी बोलायची, त्यांना चांगल पुस्तक वाचून दाखवाची आणि घरातून जेवणाचा डबा पण घेऊन यायची.. एक दिवशी मनोमन अण्णांनी काही विचार करून भेटायला आलेल्या आपल्या मुलांना सांगितले कि ते मृत्युपत्र करून संपत्तीची वाटणी करणार आहेत. आणि त्या दिवसापासून मुलांचं आणि सुनांचं वागणं बदललं. वेळेवर डबा पाठवणे आणि सारख अण्णांसोबत राहणं सुरु झालं. एवढा मोठा बदल का झालाय हे अण्णा समजून गेले होते. थोड्या दिवसात अण्णांना घरी जायची डॉक्टरने परवानगी दिली. इथे घरात तर अण्णांच्या स्वागताची जय्यय तयारी केली होती.

एकट्या पडलेल्या अण्णांच्या भोवती आज सगळे होते. ईराला सुद्धा हा बदल जाणवला होता. पण संपत्तीच्या कारणाने का होईना अण्णांना घरच्यांची सोबत मिळाली होती म्हणून ती खुश होती. अण्णा घरी आले. घर तर अगदी छान सजवलं होतं.. सुमित्राताईंचे पडदे पुन्हा लावले गेले होते. पण अण्णांनी सगळ्यांना हॉल मधे बोलवलं आणि ते बोलू लागले.. “आज तुम्हा सगळ्यांशी मला बोलायचं आहे.. तुम्हा सर्वांमधील बदल माझ्या लक्षात आलाय, तो माझ्या काळजीपोटी नसून संपत्तीसाठी आहे हे कळून चुकलंय मला.. लहानपणी तुम्ही आजारी पडला तर रात्र रात्र तुम्हा मुलांना मांडीवर घेऊन बसलोय मी, आणि सुमित्रा.. आणि आज बाप आजारी पडला तर तुम्ही निवांत वेळ मिळाल्यावर मला भेटायला यायचा? अरे मला पण मन आहे.

हे भरलेल मन आणि दुःखी हृदय कुठे घेऊन जाऊ..? माझा असह्यपणा तुम्हा कोणाला कळालच नाही.. माझं रडणार मन कोणी समजून घेतलं नाही.. किती हा पोरकेपणा?. जिथे रक्ताच्या नात्यांनी साथ दिली नाही तिथे आपुलकीने साथ दिली त्या ईराने. नात्यामध्ये मायेची उब असावी.. त्यात विश्वासाची साथ असावी हे तुमच्यापेक्षा लहान मुलीला समजते…. खरतर राखी ती बांधते मला.. मी तिचं रक्षण केलं पाहिजे पण आज तिने एकटेपणाच्या दरीत जाण्यापासून मला वाचवलं आहे. आयुष्याच्या कठीण प्रसंगी माझी साथ देऊन मैत्रीचं नातं निभावलं आहे. मैत्रीचा आणि राखीच्या धाग्यात तिने हे नातं घट्ट बांधून ठेवलंय.

हे तर माझ्या मुलांना सुद्धा जमलं नाहीये. म्हणून आज मी निर्णय घेतलाय कि, मी आपल्या दुसऱ्या घरात राहायला जाणारे जिथे माझ्या आणि सुमित्राच्या वस्तूंची कोणाला. अडचण नसेल.., आणि हो.., माझी संपत्ती मी वृद्धाश्रमात दान करणार आहे.. कारण रक्ताची नाती सुद्धा या अनोख्या मैत्रीच्या आणि राखीच्या बंधासमोर फिकी पडलीये.. चला येतो मी.. आज पासून दुसऱ्या घरात राहणार आहे.. काळजी घ्या… म्हणून अण्णा निघून गेले.., कायमचे.. मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!