जेव्हा सुनेने पहिल्यांदा घरामध्ये स्वयंपाक केला तेव्हा पहा तिथे काय घडले जाणून तुम्हाला आश्चर्यच वाटेल..

वरती तुमचे हार्दिक स्वागत अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्यापेजला नक्की लाईक करा. नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा. आणि लेखन केले आहे आदरणीय स्वप्ना मुळे यांनी.  बरोब्बर वीस दिवसांपूर्वी रुचीर आणि दियाचे लग्न झाले. लग्नानंतर दोघे फिरून आले. दिया चार दिवस माहेरी जाऊन आली. तिने महिनाभराची सुट्टी घेतली होती. नवीन घरात दियाला रुळायला थोडे सोपे व्हावे म्हणून रुचीरही काही दिवस घरूनच काम करणार होता. दियाला घरातल्या इतर कामांची बऱ्यापैकी माहिती होती तसाच थोडाफार स्वैपाक ही येतो. हे गेल्या काही दिवसांत माझ्या लक्षात आले होते.

रुचीरही तिला त्याला जमेल तशी कंपनी देत होता. नवीन लग्न झाल्यावरचे हे फुलपाखरी दिवस खरच खूप छान असतात. पुढे काळाच्या ओघात कधी वादविवाद, रुसवे फुगवे झाले तर या दिवसांच्या आठवणी फुंकरीचे काम करतात. नवीन लग्न झालेल्या सुनेला सासरच्या लोकांवर आपली छाप पाडायची असते, त्यामुळे ती अनेक कामांमध्ये जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करत असते. सगळेच एकमेकांना समजून घ्यायचा, नवे नाते निर्माण करायचा आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. त्याच भरात एके दिवशी सकाळी नाष्ट्याला आम्ही जमलो होतो तेव्हा आजचा सगळा स्वैपाक मी करणार असा फतवा दियाने काढला. तशा रोज स्वैपाकाच्या ताई यायच्या.

सध्या त्यांच्याकडे काही अडचण होती म्हणून चार दिवस त्या रजेवर होत्या. दियाला एकटीला आम्हा पाचजणांचा स्वैपाक झेपेल की नाही असे वाटून मी म्हणाले की, “अग मी मदत करते ना! आपण दोघींनी मिळून स्वैपाक करू.” “अहं आई, तुम्ही आज आराम करा. गाणी ऐका किंवा मस्तपैकी पार्लरमध्ये जा. लग्नाच्या दगदगीने दमला असाल त्यात ताईपण परवापासून रजेवर आहेत. तुम्हाला आज किचनमधून सुट्टी.. मी करेन मॅनेज आणि काही लागले तर रुचीर आहे ना. तो सांगेल.” “सॉरी दिया, आज माझ्या लागोपाठ दोन मिटिंग्स आहेत त्यामुळे मी सकाळी बारा साडेबाराच्या सुमारास मोकळा होईन. ” ” बघ ग बाळा, आज त्यालापण वेळ नाहीये.

तू एकटी कशी जमवशील सगळे? माझे ऐक, आज तू एखादी भाजी, कोशिंबीर असे काहीतरी कर. बाकीचे मी बघते. एखाद्या रविवारी तुम्हाला दोघांना सुट्टी असेल तेव्हा करा मग सगळा स्वैपाक.” तिच्या एकटीच्या जीवावर काम टाकून आपण आराम करायचा हे काही मला पटत नव्हते. ” आई, खरच मी करेन मॅनेज. मला येईल.अगदीच वाटले तर मी तुम्हाला कॉल करेन. ” हे पण म्हणाले,” अग ती एवढे म्हणतेय तर करू दे न तिला.दिया कर गं तुला काय हवं ते. आम्हालाही जरा चवीत बदल मिळेल. ” आणि बाबांना तर आपली नातसून जेवण बनवणार याचेच अप्रूप वाटत होते. शेवटी हो ना करता मी दियावर स्वैपाक सोपवून माझ्या बेडरूममध्ये गेले.

आंघोळ करून बऱ्याच दिवसांपासून वाचायची राहिलेली नवीन कादंबरी वाचायला घेतली. एरवी सकाळी अशी कादंबरी वाचत लोळणे मला स्वप्नातसुद्धा शक्य होईलसे वाटले नव्हते. कादंबरी वाचता वाचता माझा कधी डोळा लागला मलाच कळले नाही. कसल्यातरी आवाजाने मला खडबडून जाग आली. बघते तो बारा वाजून गेले होते. अगबाई इतका वेळ मी झोपले. मलाच ओशाळल्यागत झाले. मी पटकन तोंडावर पाणी मारले आणि तडक स्वैपाकघरात गेले. कानाला हेडफोन्स लावून छान गाणी ऐकत दिया पोळ्या लाटत होती. तिचा बाकीचा स्वैपाक तयारच होता. अगदी चटणी कोशिंबीरीसकट साग्रसंगीत स्वैपाक केला होता पोरीने.

शिवाय तिने शेवयांची खीरही केली होती. पटकन वाटले देवासमोर नैवेद्य दाखवावा. “अरे आई उठलात तुम्ही! मगाशी मी डोकावले होते शेवयांची खीर करू का विचारायला पण तुम्ही शांत झोपला होतात मग मी माझ्या मनानेच केली खीर. चालेल ना?” “अग, त्यात काय विचारायचं. बरं तू स्वैपाक चाखून बघितलायस का?” “नाही हो. म्हणजे माझ्या आईला चालत नाही स्वैपाक करताना चाखून बघितलेले म्हणून मीपण नाही चाखलाय. चाखून बघायला हवा होता का? ” दिया गडबडीने म्हणाली ” नाही ग. बरच झालं तू नाही चाखलस ते. आज तू पहिल्यांदाच आपल्याकडे स्वैपाक केलायस नं, मग तू केलेल्या स्वैपाक देवापुढे ठेवावा वाटले. म्हणून विचारले.

आणि एक सांगू का? माझी आई म्हणायची की खरी अन्नपूर्णा जेवण करताना ते कधीही खाऊन बघत नाही. शोभलीस हो तू पण ” तिच्या पोळ्या होता होता रूचीर भूक भूक करत आलाच. बाबा आणि हे दीडच्या सुमारास एकत्रच फॅक्टरीतून येणार होते. आज सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावे असे वाटत होते पण रुचीरला तेव्हाच मिटींग होती. मग मी ताट तयार करून देवापुढे ठेवले. दियालाही मी रूचीरबरोबर जेवायला बसायचा आग्रह करत होते पण ती ऐकेचना. “रुचीर नाही तर नाही आपण बाकीचे एकत्र जेऊ.” ती म्हणाली. रुचीरला मग नैवेद्याचे ताटच जेवायला दिले. दिया एकदम उत्कंठेने रुचीर कडे बघत होती. रूचीरने सगळे पदार्थ अगदी नावाजत खाल्ले.

हात धुताना मला म्हणाला, “आई आज रुक्मिणीबाई भाजी घेऊन आल्या नाहीत का ग? ” “अग बाई! हो का? मला माहीत नाही रे. नंतर बघून सांगते.” “बर मी जाऊ मिटींग ला? दिया कडे बघून जेवण मस्तच ची खूण करत रूचीर मिटींगसाठी रूममध्ये गेला. तितक्यात हे आणि बाबा पण आले. मी भाजी आमटी गरम करायला आत घेऊन गेले. तोपर्यंत दियाने तयारी केलीच होती. बाबा आणि ह्यांना दियाच्या हातचा स्वैपाक खूप आवडला. त्यांनी तिचे खूप कौतुक केले. दियाचा चेहरा अगदी फुलून गेला होता. जेवल्यानंतर बाबांनी दियाला जवळ बोलावून तिच्या हातात पाकिट ठेवले. आज आपल्याघरी तू पहिल्यांदा स्वैपाक केलास आणि तोही उत्तम.

म्हणून माझ्यातर्फे ही तुझ्यासाठी छोटीशी भेट. आज तुझी आजी हवी होती “बाबांना बोलताना भरून आले, दियाही गहिवरली.” थॅंक्यू आजोबा!” म्हणत ती त्यांच्या पाया पडली. मलाही खूप आनंद झाला. जेवल्यानंतर आम्ही दोघी मिळून किचन आवरत होतो. तेव्हा दिया म्हणाली,” आई आपल्याकडे कोणी रुक्मिणीबाई पण काम करतात का?” ” नाही गं. का असं का विचारतेस” मी म्हणाले “मग मगाशी रूचीर कोणत्या रुक्मिणीबाईंबद्दल बोलत होता?” मला एकदम हसूच आले. “अग ती एक मोठी स्टोरीच आहे. सांगेन कधीतरी.” “आई, आता मला खूपच उत्सुकता वाटतेय. प्लीज आत्ताच सांगा ना! ” ” तुला रुक्मिणी आणि कृष्णाची गोष्ट माहितीय का?.

कृष्ण रुक्मिणीला म्हणतो की त्याला ती जेवणातल्या मीठाएवढी आवडते. मग ती रूसते. दुसऱ्या दिवशी कृष्ण बीनमीठाचे जेवण बनवायला सांगतो. मग रुक्मिणीचा गैरसमज दूर होतो. ” ” ही गोष्ट माहिती आहे हो आई पण त्याचा आपल्या रुक्मिणीबाईंशी काय संबंध?”दियाला काही टोटल लागत नव्हती . ” अग एकदा नं आपल्याकडे प्रीतीमावशी रहायला आली होती. रुचीर आठ एक वर्षांचा असेल. तिने हौशीने पोहे केले होते पण चुकून ती पोह्यात मीठ टाकायला विसरली. रुचीरने पोहे खायला घेतलेन. “हे काय असे काय बनवलेत पोहे मावशीने पोह्यात मीठच नाही” असे पहिल्या घासालाच तोंड वाकडे करत मोठ्याने म्हणाला. प्रीतीमावशीला.

एकदम कानकोंडे झाले. आमच्या आईंनी पटकन पोह्यांवर मीठाच्या पाण्याचा हबका मारला आणि सावरून घेतलीन. पण प्रितीला खूप वाईट वाटले. ती अगदी रडवेली झाली. आईंनी मग रुचीरला रागे भरले. त्याला म्हणाल्या,” असा कोणी पदार्थ बनवला आणि तो बिघडला तर अशी चारचौघात नावे ठेवू नयेत.समोरच्याला किती वाईट वाटते” “पण मग कळणार कसे स्वैपाकात काय चुकलय ते? आणि पाहुणे आले असतील तर त्यांना काय असे पदार्थ खाऊ घालायचे का? “रुचीरच्या आजोबांनी त्याची.

बाजू घेत विचारले. “आपण एक काम करूया. काहीतरी सांकेतिक भाषा वापरूया.”हे म्हणाले रुचीरला या सांकेतिक भाषेची गंमत वाटली. आईंना रुक्मिणी कृष्णाची गोष्ट आठवली आणि त्याच म्हणाल्या,” भाजीत मीठ घालायला कोणी विसरले असले तर आपण म्हणायचे रुक्मिणीबाई भाजी घेऊन आल्या नाहीत. म्हणजे आम्हाला कळेल की भाजीत मीठ नाही ” ” आणि जर आमटीत किंवा कोशिंबीरीत मीठ नसेल तर?” दियाने विचारले. “अगदी हाच प्रश्न तुझ्या नवऱ्याने त्यावेळी विचारला होता.” मी म्हणाले. तर म्हणायचे रुक्मिणीबाई डाळ किंवा काकडी घेऊन नाही आल्या का?” मी हसत हसत म्हणाले. “एक मिनीट आई, म्हणजे मी आज.

भाजीत मीठ घातले नव्हते. हे तुम्हाला रुचीरने तुमच्या कोड लॅग्वेजमध्ये सांगितले. तुम्ही भाजी गरम करायला नेते सांगून मीठ टाकून भाजी बाहेर आणलीत!! कसले ग्रेट आहात तुम्ही मायलेक! थॅंक्यू सो मच आई “असे म्हणत दिया पटकन उठून मला येऊन बिलगली. “ते थॅंक्यू बिंक्यू काय आणि कसे म्हणायचे ते आता तू आणि तुझा नवरा बघून घ्या.” मी हसत हसत म्हणाले. आणि…. माझ्या आयटी प्रोफेशनल इंजिनियर सुनेला झक्कास लाजता पण येतं हे मात्र मला नव्यानेच कळले!!

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!